चवीने खाणार त्याला……
कल्याणात ताज्या माशांचे ब्रांडेड दुकान म्हटल्यावर माझ्यासारख्या खवय्याची पावले आपोआपच तिकडे वळली नसती तरच नवल.
‘फिश फॉर यू’ नावांनी महेंद्रसिंग काबूलसिंग शाळेसमोर सुरु झालेल्या या चकचकीत शॉपने आपल्या माशाच्या दुकानाच्या…. की ठेल्याच्या…सगळ्या परंपरागत कल्पना उडून जातात. आत प्रवेश करताच स्वच्छ प्रकाशात तेवढेच चकचकीत आणि ताजे मासे लक्ष वेधून घेतात आणि काय घेऊ अन काय नको असे होऊन जाते.
माशांच्या लोकप्रिय पापलेट, सुरमई, हलवा यांची साईज आपल्या अपेक्षेपेक्षा खूपच मोठी आणि दरही तुलनेने कमी. महत्वाचे म्हणजे हे दर कोणत्याही घासघीशी शिवाय आपल्या नियमित फिश मार्केट पेक्षा कमी आहेत.
शिवाय येथे घोळ, रावस, टुना हे काहीसे ऑफबीट प्रकारही ताजे उपलब्ध आहेत. बोंबील, बांगडा, मांदेली हे तर आहेतच.
फिश फॉर यू चे आगळे वैशिष्ठय म्हणजे येथे तुम्ही निवडलेले मासे स्वच्छ करून, काप करून त्याला विविध पर्यायांच्या चटकदार मसाल्यात मॅरीनेट करून द्यायची सोय आहे.
या चवीतही लालभडक मालवणी, अस्सल गोव्याची आठवण देणारा हिरवा मसाला, खमंग आगरी मसाला असे तोंडाला पाणी आणणारे वैविध्य आहे.
माझ्या आवडीनुसार मी एक बऱ्यापैकी मोठ्या साईझ चा हलवा किलो च्या भावाने खरेदी केला. शेफच्या सल्याने ग्रीन आणि मालवणी अशा दोन वेगवेगळ्या मसाल्यात मॅरीनेट करून घेतले. मॅरीनेट केलेले फिश हवाबंद कंटेनर मध्ये पॅक करून दिले गेले. सोबत तळण्यासाठी तांदूळ वगैरे पिठाचं मिश्रण पॅक करून दिले. सोबत प्रमोशनल ऑफर म्हणून स्वच्छ ताजे बांगडे करी करिता फ्री दिले गेले.
मॅरीनेट करणाऱ्या शेफशी बोलण्याचा मोह आवरला नाही म्हणून सहज संवाद साधला. माशांचे सुबक काप केल्यानंतर त्यांना लिंबाच्या रसात नाही तर अस्सल कोकणी कोकम आगळात धुवून घेतले जाते अन त्यानंतर सुरुवातीला हळद, मीठ लावून ठेवले जाते, त्यानंतर त्यावर इच्छित मसाल्याचे लिंपण होते अशी माहिती मिळाली. यावर कडी म्हणजे माशांना तळण्यासाठी चक्क तांदूळ आणि खास तयार केलेले पीठ सोबत पॅकिंग करून दिले जाते.
म्हणजे घरी आणा अन फ्राय करा…. बस क्रिस्पी, क्रंची, चटकदार फिश फ्राय तयार….अफलातून चव…जिभेवर रेंगाळणारी.
मी खरेदी केलेल्या हलव्याची चव केवळ अप्रतिम म्हणावी अशीच…हिरव्या मसाल्याच्या मॅरिनेशन मधील फ्राय फिश अस्सल गोव्याच्या ‘मार्टीन्स कॉर्नर’ ची आठवण देणारा…..
मॅरीनेट केलेल्या माशांचे पॅकिंग इतके सुबक की गरजेपुरते काढून पुन्हा आपल्या घरच्या फ्रीज मध्ये हवाबंद ठेवणे सहज शक्य. आणि हो होम डिलिव्हरी चा पर्याय आहेच.
ताजेपणा, स्वच्छता, चव, शॉप मधील चालक/कर्मचारयांच्या तत्पर, विनम्र प्रतिसादामुळे मत्स्यप्रेमींनी पुनः पुन्हा भेट द्यावे असे हे ठिकाण असल्यास नवल नाही.